मुंबई /जळगाव । राज्यात दमदार सुरुवात केलेल्या मान्सूनने सध्या विश्रांती घेतल्याने जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात उकाडा वाढला आहे. जुलै महिना अर्धा संपत आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दुबार पेरणीचे संकट गडद होत आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाने 20 जुलैनंतर राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सध्या मान्सूनची प्रणाली कमकुवत झाल्याने आणि पश्चिमेकडून कोरडे वारे वाहत असल्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार होत नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रावर विरल्याने राज्यभरातील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
जळगाव जिल्ह्यात काय स्थिती?
जळगाव जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, या सरी तुरळक स्वरूपाच्या असतील. त्यामुळे तापमानात फारसा बदल होणार नसून उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती राहणार आहे.
शेतकऱ्यांची वाढली चिंता
पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे खरीप हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पेरणी झालेल्या पिकांना पावसाची गरज असून, पुढील काही दिवस पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. राज्यात यंदा ‘एल निनो’चा प्रभाव जाणवत असून सरासरीपेक्षा सुमारे 10 टक्के कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
20 जुलैनंतर पुन्हा पावसाची शक्यता
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे.
16 जुलै: विदर्भातील काही भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता.
17 जुलै: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज.
20 जुलैपासून: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत व्यापक आणि मुसळधार पाऊस सक्रिय होण्याची शक्यता.
जळगाव जिल्ह्यातही 20 जुलैनंतर पावसाची परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, त्यानंतर खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.















Discussion about this post