जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या गोटात मोठी खळबळबळ उडाली आहे. खडसेंच्या संभाव्य घरवापसीमुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली असून, या पार्श्वभूमीवर संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदार आणि निवडक पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहू नये, अशी विनंती जळगाव भाजप नेत्यांनी केली आहे. खडसेंच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि जिल्ह्यात चुकीचा संदेश जाईल, अशी भीती गिरीश महाजन व इतर नेत्यांनी फडणवीसांसमोर व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी जळगावच्या सर्व नेत्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आहे, मात्र खडसेंच्या अमृतमहोत्सवाला जायचे की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.
विनोद तावडेंच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
नुकतीच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. स्थानिक नेत्यांच्या अस्वस्थतेचे मुख्य कारणही हीच भेट ठरली.या सर्व चर्चांवर स्वतः एकनाथ खडसे यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की:”मला आता भाजपमध्ये प्रवेश करण्यात कोणताही रस राहिलेला नाही. मी शरद पवार साहेबांसोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्याच सोबत राहीन. माझे काही कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत, ते जातील; पण मी भाजपमध्ये जाणार नाही.”















Discussion about this post