जळगाव । अर्ध्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाच्या संदर्भात अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अखेर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक आणि मालेगाव परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, अवघ्या २४ तासांत उपयुक्त जलसाठ्यात दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे.
आज सकाळची धरणाची स्थिती
आज बुधवारी सकाळपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गिरणा धरणातील उपयुक्त जलसाठा २७.१६ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यातील डोंगरी भागात आणि धरणाच्या मुख्य पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. त्यामुळे आगामी २४ तासांत धरणात आणखी मोठ्या प्रमाणावर नवीन पाणी दाखल होण्याची दाट शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
शेतकरी आणि नागरिकांची चिंता मिटणार
जळगाव जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची भिस्त आणि शेतीची सिंचन व्यवस्था मोठ्या प्रमाणावर गिरणा धरणावर अवलंबून आहे. चालू मोसमात धरणाची पाणीपातळी खालावल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नाशिकमधील मुसळधार पावसामुळे धरणात झालेली ही वाढ जळगावकर नागरिक आणि बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक ठरली आहे. पावसाचा हाच जोर कायम राहिल्यास धरणाचा जलसाठा झपाट्याने वाढेल, अशी आशा व्यक्त होत आहे.















Discussion about this post