मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावत, अशा अफवा पसरवणे ही भाजपची राजकीय कार्यपद्धती असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात सातत्याने विरोधी पक्षांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. “आमचे सहा खासदार पैशांच्या जोरावर फोडण्यात आले. त्यानंतर आता रोज आमदार फुटणार, पक्ष फुटणार अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र, काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीला आमचे जवळपास सर्व आमदार उपस्थित होते. त्यामुळे अशा अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संभाव्य भूमिकेबाबत बोलताना राऊत म्हणाले, “शरद पवार यांच्या विचारसरणीची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांचा पक्ष एनडीएमध्ये जाईल किंवा त्यात विलीन होईल, ही शक्यता मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीचे भविष्य मजबूत आहे.”
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. “शिंदे स्वतःचा पक्ष भाजपपेक्षा मोठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आव्हान आहे. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा एवढी वाढली आहे की, भविष्यात ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही आव्हान देऊ शकतात,” असा दावा त्यांनी केला.















Discussion about this post