नवी दिल्ली । अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी झाल्यानंतर तसेच स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील जहाजवाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, केंद्र सरकारने याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण देत सध्या इंधन दरकपातीची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठे बदल होत असले तरी भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुलनेने स्थिर ठेवण्यात सरकारला यश आले आहे. गेल्या चार वर्षांत पेट्रोलच्या दरात केवळ ५.५८ टक्के, तर डिझेलच्या दरात ६.२३ टक्के वाढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरकपात सध्या शक्य नाही
हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, सरकारी तेल विपणन कंपन्या अजूनही सुमारे २.१८ लाख कोटी रुपयांची तूट भरून काढत आहेत. याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर अधिक असताना खरेदी करण्यात आलेल्या इंधनाचा साठा अजूनही कंपन्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘दर कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’
“सध्याच्या परिस्थितीत इंधनाचे दर कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील अस्थिरतेचा मोठा परिणाम भारतीय ग्राहकांवर होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने सातत्याने प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशभरात इंधन पुरवठा अखंडित
स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरात तणावाचे वातावरण असतानाही भारतातील इंधन पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही, असे पुरी यांनी सांगितले. देशातील कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन टंचाई निर्माण झाली नाही. संकटकाळातही देशभरातील सुमारे १.०७ लाख पेट्रोल पंप सुरळीतपणे सुरू होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींतील चढ-उतारामुळे निर्माण झालेला मोठा आर्थिक भार सरकारने स्वतः उचलला. त्यामुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडू दिला नाही, असा दावाही केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केला.















Discussion about this post