नवी दिल्ली । सर्दी-खोकला किंवा घसा दुखू लागला की अनेकजण थेट मेडिकल स्टोअरमधून कफ सिरप खरेदी करतात. मात्र आता ही पद्धत बदलणार असून, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप आणि काही सिरप स्वरूपातील औषधे विक्री करता येणार नाहीत. केंद्र सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपच्या सेवनानंतर काही मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनांमुळे देशभरात चिंता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषधांच्या विक्रीवर अधिक नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जून रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
नवीन नियमांनुसार, सिरप स्वरूपातील काही औषधांची ‘ओव्हर द काउंटर’ (OTC) विक्री बंद करण्यात आली आहे. म्हणजेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही औषधे थेट ग्राहकांना विकता येणार नाहीत. सरकारने यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली होती आणि आता या नियमांची अंमलबजावणी अधिकृतपणे करण्यात आली आहे.
ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स नियमांमधील बदलानुसार ‘शेड्युल K’ अंतर्गत मिळणाऱ्या काही सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कफ सिरपसह सिरप स्वरूपातील काही औषधांच्या विक्रीसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक करण्यात आले आहे.
या निर्णयाचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे. किरकोळ सर्दी किंवा खोकल्यासाठी स्वतःच्या मनाने औषध घेण्याऐवजी आता डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषध खरेदी करावे लागणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करून प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सवर कायदेशीर कारवाईसह परवाना रद्द करण्याची कारवाईही होऊ शकते.
या निर्णयामुळे औषधांचा गैरवापर रोखण्यास मदत होईल आणि नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post