शेतकरी कर्जमाफीच्या शासन निर्णयात (GR) सुधारणा करण्यासाठी पंढरपूर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांची भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन यांनी रोहित पवारांसमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून बैठकीचे आश्वासन दिले. या सकारात्मक मध्यस्थीनंतर रोहित पवार यांनी २२ जूनपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीच्या अटीवर आपले उपोषण मागे घेतले आहे.
आंदोलन स्थगित केल्यानंतर बोलताना रोहित पवार म्हणाले, “२२ जूनपासून राज्याचे अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी सरकारसोबत आमची महत्त्वाची बैठक होईल. ३० जूनपासून कर्जमाफी लागू होणार असून, जीआरमधील आवश्यक बदल ३० जूनपूर्वीच केले जातील. मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या या बैठकीत केवळ आम्हीच नाही, तर राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर, शिवसेना (ठाकरे गट) आणि शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर यांच्यासह सर्वच प्रमुख शेतकरी नेते उपस्थित राहून सविस्तर चर्चा करतील.”
रोहित पवारांनी सरकारला सावध करत पुढे म्हटले की, “आमच्या दोन छोट्या अटी आहेत. उगाच राजकारण करून उपोषण लांबवायचे नाही आणि शेतकऱ्यांचे नुकसान करायचे नाही म्हणून आम्ही पाऊल मागे घेतले आहे. मात्र, जर या बैठकीत आणि जीआर बदलामध्ये काही गडबड झाली, तर आगामी ४ जुलै रोजी मराठवाड्यात याहून मोठे आंदोलन उभे केले जाईल.” तसेच, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने त्यांचीही तातडीने भेट घ्यावी, अशी मागणी पवारांनी केली.
शेतकरी अडचणीत असल्याने सरकार सकारात्मक: गिरीश महाजन
रोहित पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अत्यंत सकारात्मक आहे. केंद्र आणि राज्य सरकार, म्हणजेच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले आहेत. शेतकरी वारंवार अडचणीत येत असल्यामुळेच सरकारला कर्जमाफी द्यावी लागते. यासोबतच आम्ही शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्नही कायमचा सोडवत आहोत. रोहित पवार यांनी मांडलेल्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावण्यात आली असून, चर्चेतून नक्कीच सकारात्मक तोडगा निघेल.”















Discussion about this post