जळगाव । राज्यात मोठ्या प्रमाणावर जाहिरातींवर पैसा उधळला जात आहे, सत्ताधाऱ्यांचे परदेश दौरे आणि मोठमोठे टेंडर व्यवस्थित सुरू आहेत. या सगळ्यासाठी सरकारकडे पैसा आहे; मात्र लाडक्या बहिणींना मिळणारे १५०० रुपये सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात का खुपत आहेत?” असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तून तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
याबाबत अधिक बोलताना खडसे म्हणाल्या की, २०२४ साली निवडणुकांच्या तोंडावर सरकारने लाडकी बहीण योजना आणली. सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळेल असे तेव्हा सांगितले गेले होते. निवडणुका होत्या म्हणून सुमारे 2.34 कोटी ते 2.48 कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि २०२५ साली सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू केली. वेगवेगळे निकष लावून जवळपास २६ लाख महिलांना अपात्र असल्याचे सांगण्यात आले. आता २०२६ मध्ये ई केव्हायसीची अट शासनाने लावली आहे. यात सुमारे 80 लाख नावे यादीतून वगळण्यात आली, त्यामुळे लाभार्थी संख्या 2.48 कोटींवरून 1.68 कोटींवर आली आहे असे त्यांनी सांगितले.
शासन हळूहळू लाडक्या बहिणींची संख्या कमी करत आहे का ? आता कोणत्याही निवडणुका नसल्या कारणाने लाडक्या बहिणी महत्त्व कमी झाले आहे का ? काम सरो वैद्य मरो असे काही शासनाला वाटत आहे का ? लाडक्या बहिणींना १५०० रुपये देणे जड झाले आहेत म्हणून तर महिलांची संख्या या योजनेतून कमी केली जात नाही असे असंख्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे असंही त्या म्हणाल्या. आज इतकी महागाई या सरकारने वाढवून ठेवली आहे, या महागाईच्या काळात १५०० रुपये दिलासा देणारे ठरले असते, त्यांच्या संसाराला थोडा हातभार लागला असता. पण सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचे कारणं शोधत आहे अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.













Discussion about this post