मुंबई । राज्यातील थकबाकीदार आणि नियमित कर्ज भरणार्या शेतकऱ्यांसाठी अखेर अत्यंत आनंदाची आणि प्रतीक्षित बातमी आली आहे. येत्या १० दिवसांच्या आत राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी अधिकृत आणि मोठी घोषणा राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केली. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मृग नक्षत्र आणि खरीप पेरणीच्या तोंडावरच कर्जमाफी होणार असल्याने ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा हलका होणार असून, अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
काय आहे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’?
राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफी देण्याचे आश्वासन विधानसभेत दिले होते, त्यानुसार आता अंमलबजावणी सुरू झाली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्या पात्र शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहे, त्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज राज्य सरकार माफ करणार आहे. तसेच प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCB) किंवा पीक कर्ज देण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज या योजनेसाठी पात्र ठरेल.
शेतकऱ्यांनी ‘या’ गोष्टी तातडीने करणे अनिवार्य!
कर्जमाफीचा लाभ थेट खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळेत आपली कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. सरकारने दिलेल्या सूचनेनुसार खालील दोन प्रक्रिया पूर्ण असणे अत्यंत गरजेचे आहे:
१. ‘ॲग्री स्टॉक’ वर नाव नोंदणी करणे.
२. आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे.
राज्य सरकारच्या कर्जमाफीचा केवळ शेतकर्यांनाच नाही तर सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांनाही तसेच पीक कर्ज देणाऱ्या पतसंस्थांना मोठा फायदा होईल. सध्या अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यांना पीक कर्ज माफीचा मोठा फायदा होईल. त्यांचे येणं, मोठी थकबाकी वसूल होईल. शेतकर्यांच्या खात्यावरील कर्ज माफ होणार आहे. थकीत कर्ज शासन भरणार असल्याने बँकांची वसूली होणार आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तर थकीत कर्ज खाती निरंक होणार असल्याने बँकांची पत सुधारणार आहे.














Discussion about this post