जळगाव । ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पाऊस तब्बल पंचवीस दिवस उशिराने राज्यात दाखल झाला. नंतर मात्र चांगल्या पावसाने जूनमधील पावसाची उणीव भरून काढल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ चांगली होत होती. मात्र राज्यात मागील काही दिवसापासून पावसाने उसंती घेतली असून यामुळे खरिपाची पिके करपू लागली आहेत.
‘अल निनो’च्या प्रभावामुळे दोन आठवड्यांपासून ‘मॉन्सून’ कमजोर झाला आहे. त्यामुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यात पाऊस नसल्याचे चित्र आहे.अनेक ठिकाणी जमिनी कोरड्या होऊन भेगा पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस पडण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिक प्रार्थना करू लागले आहेत.
पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना पिकांतील तण काढण्यास वेळ मिळाला असला तरी पिकांची वाढ पावसाअभावी खुंटली आहे. बागायतदार विहिरीतील पाणी पिकांना देताहेत. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांना पिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पाऊस अजून लांबल्यास पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, हवामान खात्याने २० ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तविली आहे. २० ते २१ दरम्यान काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. त्यानंतर म्हणजे २५ ऑगस्टनंतर चांगला पाऊस पडेल, अशी माहिती हवामान अभ्यास नीलेश गोरे यांनी दिली.
Discussion about this post