गडचिरोली| आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. गरज आहे ती, त्यांच्या क्षमतेला शिक्षण आणि रोजगाराची जोड देण्याची. हीच बाब लक्षात घेऊन आदिवासीचे कौशल्य जगासमोर आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता मागील सत्राप्रमाणे या वर्षीही पदव्युत्तर शैक्षणीक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशाकरिता मोफत प्रवेश देणे सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणारे गोंडवाना विद्यापीठ हे यावर्षीही राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.तसेच या सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गोंडवाना विद्यापीठाने केली आहे.
बरेचदा विद्यार्थ्यांना एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना आर्थिक चणचण जाणवत असते आणि मग प्रवेश घ्यायचा राहूनच जातो. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी संपर्क अभियान सुरू केले आहे. विद्यापीठाचे प्राध्यापक स्वतः या भागात फिरून विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत.जेणे करून विद्यार्थी शिक्षणाकडे वळतील. गडचिरोली बसस्थानक ते गोंडवाना विद्यापीठापर्यत प्रवासासाठी बसची सुविधाही करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश तसेच क्रांतिवीर बाबूराव शेडमाके “कमवा आणि शिका” योजने अंतर्गत त्यांना आर्थिक मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटला अधिकाअधिक महत्व देत त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जात आहे.विद्यार्थ्यांना विद्यापीठापर्यंत येण्यास त्रास होऊ नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रवेशाकरिता विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय विद्यार्थी सुविधा केंद्र, श्री शंकरराव बेझलवार आर्ट अँड कॉमर्स महाविद्यालय ,अहेरी आणि शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय तुकुम, चंद्रपूर येथे नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. एम .ए. इंग्रजी ,समाजशास्त्र, इतिहास, उपयोजित अर्थशास्त्र, मराठी ,जनसंवाद ,एम कॉम, एमएससी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ,संगणक शास्त्र, या सर्व अभ्यासक्रमाच्या सत्र २०२३-२४ च्या प्रथम वर्षाकरिता मोफत प्रवेश देणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ आहे.
सध्या गडचिरोली जिल्हयात उच्च शिक्षणातील सकल नोंदीचे प्रमाण केवळ १४ टक्के आहे. आदिवासी व ग्रामीण जनतेच्या समस्यांच्या अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण शिक्षण न घेणे हे आहे. या सामाजिक वास्तवाचा विचार करता अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हाच ध्यास गोंडवाना विद्यापीठाने घेतला आहे.
Discussion about this post