जळगाव । जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र डिझेल तुटवड्याचा फटका आता थेट शेती क्षेत्राला बसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष कमालीचा आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांसाठी २५ टक्के डिझेलचा कोटा राखीव ठेवण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने केली.
एवढेच नव्हे, तर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार अडवून धरत येणाऱ्या-जाणाऱ्या सरकारी वाहनांची अडवणूक केली.या अचानक झालेल्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ प्रचंड तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर शेतीकामांसाठी इंधन मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. या गंभीर समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीने आधीच इशारा दिला होता. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांसाठी डिझेलचा स्वतंत्र कोटा राखीव ठेवावा, अन्यथा एकाही सरकारी वाहनाला रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, असा इशारा पक्षाने दिला होता. त्या इशाऱ्याची अंमलब्यावणी करत आज थेट सरकारी वाहने अडवून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, जिल्ह्यातील डिझेल तुटवड्यामुळे आमचा शेतकरी राजा मोठ्या अडचणीत सापडला आहे. ऐन गरजेच्या वेळी शेतीकामांसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. आम्ही सरकारला आधीच चेतावणी दिली होती की शेतकऱ्यांसाठी २५ टक्के डिझेल कोटा राखीव करा. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केले. जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारी वाहने रस्त्यावर फिरू देणार नाही. हा लढा अधिक तीव्र केला जाईल.















Discussion about this post