नवी दिल्ली । अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नसल्याने त्याचा थेट फटका आता भारताला बसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोने, पेट्रोल-डिझेलचा वापर आणि परदेश दौरे टाळण्याचे केलेल्या आवाहनावरून आता देशात मोठे राजकीय युद्ध पेटले आहे. काँग्रेसने या मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरले असून, “हा पंतप्रधानांच्या अपयशाचा थेट पुरावा आहे,” अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्वीट
हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी मोदींनी केलेल्या आवाहनावरही भाष्य केले आहे. देशात इंधन आणि LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे… आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही फक्त इव्हेंटबाजी, फोटोशूट आणि प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत! निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची अक्षरशः राख केली आणि आता जनतेलाच उपदेश देत आहेत
राहुल गांधी यांनी सोमवारी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर जोरदार हल्ला चढवला. काल पंतप्रधान मोदींनी जनतेकडून त्यागाची मागणी केली, ते म्हणाले: सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खत आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा आणि घरून काम करा. हे त्यांचे उपदेश नाहीत, तर त्यांच्या अपयशाचा पुरावा आहे. गेल्या १२ वर्षांत देशाची अशी अवस्था झाली आहे की, जनतेला काय खरेदी करावे, काय करू नये, कुठे जावे आणि कुठे जाऊ नये हे सांगावे लागते. प्रत्येक वेळी, ते स्वतः जबाबदारीतून सुटण्यासाठी जनतेवर जबाबदारी ढकलतात. देश चालवणे हे आता एका तडजोड केलेल्या पंतप्रधानांच्या हातात राहिलेले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.















Discussion about this post