जळगाव | जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) लाचखोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून शाखा अभियंता योगेश अहिरे यांना ५ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरातच आज शनिवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, एका मक्तेदाराचे बिल सार्वजनिक बांधकाम विभागात प्रलंबित होते. संबंधित बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी शाखा अभियंत्याने तब्बल १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात तडजोडीनंतर ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना योगेश अहिरे यांना अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
या कारवाईनंतर विभागात मोठी चर्चा सुरू झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागातील कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. यापूर्वीही या विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.















Discussion about this post