छत्रपती संभाजीनगर: राज्यभरात आज शुक्रवारी दहावीच्या निकालाची उत्सुकता आणि गडबड सुरू असतानाच, छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच, आपण नापास होऊ या भीतीने एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगर परिसरात घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोहम ज्ञानेश्वर मोरे (वय १७ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहम मोरे हा पुंडलिक नगरमधील गल्ली नंबर १० येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. तो यंदा दहावीच्या परीक्षेला बसला होता आणि आज (८ मे) त्याचा निकाल जाहीर होणार होता. मात्र, “मी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाही, मला कमी गुण मिळतील,” अशी तीव्र भीती त्याच्या मनात घर करून बसली होती.
याच निकालाच्या प्रचंड धास्तीने आणि तणावाखाली येऊन सोहमने आज सकाळी, निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपल्या राहत्या घरात गळफास लावून आपले जीवन संपवले. निकाल लागण्याआधीच मुलाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सोहमचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सोहमच्या या अत्यंत दुर्दैवी आत्महत्येमुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेच्या आणि निकालाच्या मानसिक दडपणाचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. गुणपत्रक किंवा परीक्षा म्हणजे संपूर्ण आयुष्य नव्हे, हे मुलांना पटवून देण्यात आपण कुठे कमी पडत आहोत का? असा संतप्त आणि विचार करायला लावणारा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.















Discussion about this post