शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने कहर सुरू केला असून या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, शिमल्यात भूस्खलनामुळे शिवमंदिर कोसळल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये जवळपास 50 भाविक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
सावन सोमवार असल्याने शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दरडीचा ढिगारा शिवमंदिरावर पडला. अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शिमलाच्या समरहिल भागात असलेल्या शिव मंदिरात घडली. पोलीस आणि प्रशासन बचावकार्यात गुंतले आहे.
मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिली
शिव मंदिर कोसळल्यानंतर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, शिमला येथून दुःखद बातमी समोर आली आहे, जिथे समर हिलमधील शिव मंदिर मुसळधार पावसामुळे कोसळले. आतापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन तत्परतेने मलबा हटवण्याचे काम करत आहे.
सीएम सखू यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा दुर्घटनेचा सामना करावा लागला आहे, गेल्या 48 तासांपासून सतत पाऊस पडत आहे. राज्याच्या विविध भागांतून ढगफुटी आणि भूस्खलनाच्या बातम्या येत आहेत, ज्यामुळे नुकसान झाले आहे. मौल्यवान जीव- मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मी लोकांना निसरड्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन करतो आणि पाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करतो.
मुसळधार पावसाने डोंगरात कहर केला
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा कालावधी सुरू आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात अनेक ठिकाणी निसर्गाचा कहर पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. हिमाचलमध्ये बियास नदीला उधाण आले आहे. तर दुसरीकडे उत्तराखंडच्या पौडीमधील गडवालमध्ये अलकनंदा नदीच्या प्रवाहानेही लोकांना घाबरवायला सुरुवात केली आहे.