मुंबई । राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पावसाने अनेक भागाला झोडपून काढलं. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अतोनात नुकसान झाले. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे. आता पाऊस कधी परतणार याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे. अशातच राज्यात या आठवड्यात पाऊस ‘कमबॅक’ करेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, तरी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाकडून निराशा होण्याची चिन्हे आहेत.
१७ ऑगस्टपर्यंत उत्तर महाराष्ट्रात केवळ हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पावसाळ्याचा अडीच महिन्यांचा कार्यकाळ सरला आहे. आणखी दीड महिना म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत पावसाचा हंगाम आहे. परंतु, अजूनही अनेक जिल्ह्यांत आणि तालुक्यांत समाधानकारक पाऊस होऊ शकलेला नाही.
ऑगस्ट महिन्यात, तर जिल्ह्याच्या बहुतांश भागातून पाऊस गायब झाल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे. या महिन्यातील पहिले १३ दिवस कोरडे गेले असताना आता १७ ऑगस्टपर्यंत नाशिकसह जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत पावसाच्या निव्वळ हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली असताना उत्तर महाराष्ट्रात मात्र पुढील आठवडा कोरडाच जाण्याची शक्यता आहे.