धरणगाव । जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक घृणास्पद घटना समोर आली आहे. आपल्याच विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून तब्बल तीन वर्षे तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राहुल जगन्नाथ अहिरे असे या वासनांध शिक्षकाचे नाव असून या घटनेनं खळबळ उडाली.
संशयित आरोपी शिक्षक राहुल अहिरे याने पीडित मुलगी इयत्ता नववीत असताना तिच्याशी जवळीक साधली होती. सुरुवातीला गोड बोलून त्याने मुलीचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केले. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने तिचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो २०२२ पासून ते सप्टेंबर २०२५ पर्यंत सातत्याने तिच्यावर अत्याचार करत होता.
शाळा सुटली, पण छळ सुटेना!
पीडित मुलगी शाळा सोडून महाविद्यालयात गेल्यानंतरही राहुल अहिरे याचा छळ थांबला नव्हता. तो वारंवार जुन्या फोटोंचा धाक दाखवून शरीरसंबंधांची मागणी करत तिला ब्लॅकमेल करत होता. या असह्य मानसिक त्रासामुळे विद्यार्थिनी प्रचंड तणावात होती. अखेर तिने धैर्याने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.
भररस्त्यात काढली धिंड; व्हिडिओ व्हायरल
मुलीवर झालेला अन्याय ऐकून संतापलेल्या कुटुंबीयांनी या शिक्षकाला धरणगावमध्ये गाठले. यावेळी संतप्त नातेवाईकांनी आणि पीडितेने या नराधमाला काठ्यांनी बेदम चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, यात पीडितेचा आक्रोश आणि शिक्षकाची झालेली धुलाई पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पळण्याच्या प्रयत्नात या शिक्षकाचा पायही मोडल्याची माहिती आहे.
नराधम शिक्षकावर ‘पोक्सो’ अंतर्गत कारवाई
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल करत आरोपी राहुल अहिरे याला अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो (POCSO) आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.















Discussion about this post