जळगाव लाईव्ह न्यूज । सर्वत्र लग्नसराईचे वातावरण असताना जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी दर वाढले होते; मात्र दुसऱ्याच दिवशी मंगळवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जागतिक आर्थिक घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरातील बदल तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी-पुरवठ्याच्या स्थितीचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर होत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे मत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये अस्थिरता कायम असून गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांमध्येही सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोन्याच्या दरात मोठी घट
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी २०६ रुपयांची वाढ होऊन २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,९८५ रुपये इतके झाले होते. मात्र मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडताच १,३०९ रुपयांची घसरण नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,६७६ रुपये पर्यंत खाली आले आहेत.
चांदीतही दर घसरले
चांदीच्या दरातही असाच ट्रेंड दिसून आला. सोमवारी ३,०९० रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर प्रति किलो २,४८,२३० रुपये झाले होते. मात्र मंगळवारी तेवढ्याच प्रमाणात म्हणजे ३,०९० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर पुन्हा २,४५,१४० रुपये प्रति किलोवर आले आहेत.















Discussion about this post