मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात युद्ध अजून संपलेले नसल्याचे स्पष्ट करत ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ ही लष्करी मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगितले. पुढील दोन ते तीन आठवड्यांत अधिक कठोर भूमिका घेत इराणवर मोठा हल्ला केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अमेरिका आपली सर्व उद्दिष्टे साध्य करण्याच्या मार्गावर असून इराणमधील प्रमुख लक्ष्ये लवकरच पूर्ण केली जातील. “आमची लक्ष्ये साध्य करण्यासाठी आम्ही आमची मोहीम सुरूच ठेवू. पुढील काही आठवड्यांत आम्ही त्यांच्यावर जोरदार कारवाई करू,” असे ते म्हणाले.
दरम्यान, ट्रम्प यांनी इराणला इशारा देत सांगितले की, जर कोणताही करार झाला नाही, तर इराणमधील सर्व वीज निर्मिती प्रकल्पांवर एकाच वेळी मोठा हल्ला केला जाऊ शकतो. त्यांनी दावा केला की इराणचे नौदल आणि हवाई दल मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाले असून त्यांच्या अनेक सर्वोच्च नेत्यांचा मृत्यू झाला आहे.या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून जागतिक स्तरावर या परिस्थितीकडे गंभीरपणे पाहिले जात आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी इराण युद्धासंदर्भात दिलेल्या भाषणानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये जबरदस्त यू-टर्न पहायला मिळाला. त्यांच्या या भाषणानंतर 100 डॉलर्सच्या खाली पोहोचलेल्या कच्च्या तेलाने मोठी उसाळी मारली असून आता कच्च्या तेलाचे भाव 105 डॉलर्सपर्यंत पोहोचले आहेत.















Discussion about this post