नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ३१० रुपयांची वाढ केली आहे. सलग चौथ्या महिन्यात झालेल्या या दरवाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळींमधील जेवण महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महिनाभरापासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात इंधन दर वाढत असल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत दरांवरही होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त नागरिकांना या दरवाढीचा आणखी फटका बसणार आहे.
इंडियन ऑइल (IOCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या सरकारी तेल कंपन्यांनी नवीन दर आजपासून लागू केले आहेत. त्यानुसार आर्थिक राजधानी मुंबईमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता २,०३१ रुपये, तर दिल्लीमध्ये २,०७८.५० रुपये झाली आहे. कोलकाता येथे हा सिलिंडर २,२०८ रुपये, तर चेन्नईमध्ये २,२४६.५० रुपये दराने उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. याआधी ७ मार्च रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती.
महत्त्वाचे म्हणजे, २०२६ च्या पहिल्या चार महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात एकूण ४९८ रुपयांची वाढ झाली असून, सलग वाढत्या दरांमुळे व्यावसायिक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post