जळगाव : वडगावपान (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथे शाळकरी मुलीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळ, जळगाव जिल्हा जळगाव व समस्त सुवर्णकार समाज जळगाव यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी सुवर्णकार समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडगावपान येथील तेरा वर्षीय चिमुकली कुमारी ईश्वरी संजय डहाळे, ही इयत्ता सहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी असून तिच्यावर एका नराधमाने ॲसिड हल्ला करून गंभीर जखमी केले. ही अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना असून या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या घटनेचा निषेध नोंदवित सुवर्णकार समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आल्या- संबंधित आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी, आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी, सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, पीडित कुमारी ईश्वरी डहाळे हिला शासनाकडून तातडीची मदत मिळावी, भविष्यात असे हल्ले होऊ नयेत यासाठी शासन व पोलिसांनी योग्य उपाययोजना कराव्यात तसेच ॲसिड किंवा तत्सम रासायनिक पदार्थांच्या विक्री व वापरावर कडक नियम व निर्बंध लागू करण्यात यावेत.
सदर निवेदनाची शासन दरबारी तातडीने दखल घेऊन आरोपीस अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विजय सोनार, माजी अध्यक्ष सुनील दिगंबर कपोते, महिला अध्यक्ष सौ. उषाताई सोनार, युवा अध्यक्ष दिपक सोनार तसेच मंडळातील सदस्य व ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते.















Discussion about this post