महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून लवकरच 5 हजारांहून अधिक प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदांमुळे निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी ही मेगाभरती राबविण्यात येणार आहे.
राज्यात सध्या सुमारे 11 हजार शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 5 हजार 412 पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केली. या भरतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये दीर्घकाळापासून शिक्षकांची कमतरता जाणवत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची तक्रार विविध स्तरांतून केली जात होती. या पार्श्वभूमीवर सरकारने रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला असून यामुळे शिक्षण व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
या मेगाभरती अंतर्गत सहायक प्राध्यापक, प्राध्यापक तसेच इतर शैक्षणिक पदांसाठी नियुक्त्या केल्या जाणार आहेत. भरती प्रक्रियेमुळे राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये अध्यापनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या भरती प्रक्रियेची सविस्तर अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाणार असून पात्र उमेदवारांना त्यानुसार अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.















Discussion about this post