जळगाव । जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असताना हवामान विभागाने जळगावसाठी १० आणि ११ मार्च या दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून तापमानाचा पारा ४० ते ४१ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
यंदाचा उन्हाळा कडक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तवला होता. मात्र, मार्च महिन्याच्या केवळ दुसऱ्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा सामना करण्याची वेळ जळगावकरांवर येणे, ही २०१७ नंतरची पहिलीच घटना आहे.
सोमवारी (दि.९) जळगावचे तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, जी या हंगामातील आतापर्यंतची सर्वोच्च नोंद आहे. यामुळे दुपारच्या वेळेस रस्त्यावर पूर्णतः शुकशुकाट पसरला आहे. नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत असल्याने नागरिक थंड पेय मिळेल त्या ठिकाणी जात आहेत.
हवामान विभागाने आगामी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तविला असून, त्यानंतरही पारा ४० अंशांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेचा धोका लक्षात घेता, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी घराबाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.















Discussion about this post