अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या काही प्रमुख मागण्यांसाठी आज देशव्यापी संप पुकारला असून त्याचा फटका हजारो लहान मुलांना बसला आहे. अनेक ठिकाणी अंगणवाडी केंद्रांना टाळे लावण्यात आल्याने नेहमीप्रमाणे पोषण आहाराच्या आशेने आलेल्या चिमुकल्यांना बंद दाराचा सामना करावा लागला. काही ठिकाणी हातात रिकाम्या ताटल्या घेऊन बसलेली मुले अन्नाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
एकीकडे शासकीय दर्जा आणि हक्काच्या वेतनासाठी अंगणवाडी सेविकांचा आक्रोश सुरू असताना, दुसरीकडे पोषण आहार न मिळाल्याने लाखो बालके आज पोषक आहारापासून वंचित राहिली आहेत. त्यामुळे पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.
अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे : –
केंद्र सरकारच्या चार श्रम संहिता रद्द करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मागणी
शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि हक्काच्या वेतनश्रेणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार
गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेविकांना २४ हजार ८०० रुपये आणि मदतनीसांना २० हजार ४०० रुपये वेतन देण्याची मागणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामाचा थकीत मोबदला तातडीने देण्याची मागणी
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मूळ कामाव्यतिरिक्त इतर कामांना जुंपू नका समन्वय समितीचा इशारा
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करा आणि सामाजिक सुरक्षा म्हणून पेन्शन द्या
उन्हाळी सुट्टी १५ दिवसांऐवजी १ महिना करा आणि आजारपणाची भरपगारी रजा मंजूर करा
FRS मधील तांत्रिक अडचणी दूर करा आणि 5 जी मोबाईलसह ३ हजार ६०० रुपये रिचार्ज भत्ता द्या
दरम्यान, या संपामुळे राज्यातील हजारो अंगणवाड्या ठप्प झाल्या असून प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. बालकांच्या पोषणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post