पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून, त्यांच्या सोबत तब्बल ७२ नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. यामध्ये २४ माजी आमदारांचा समावेश असल्याने काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी शनिवारी (ता. २४) आपल्या डझनभर सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी हा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेससाठी ही मोठी राजकीय नामुष्की मानली जात आहे.
सलग अनेक निवडणुकांतील अपयशानंतर काँग्रेस उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अशातच नसीमुद्दीन सिद्दीकी यांचा राजीनामा हा पक्षासाठी मोठा धक्का ठरला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post