नगरपरिषदा, महापालिका निवडणुकीतील बिनविरोधचा ट्रेंड आता जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीतही कायम राहिलाय. मतदानाआधीच पंचायत समितीमध्ये भाजपने विजयाचे खाते उघडलेय. सिंधुदुर्गातील वैभाववाडीमध्ये भाजपने आपले खातं उघडलं आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर जिल्ह्यात भाजपची ही पहिलीच बिनविरोध निवड ठरली आहे. वैभववाडी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे.
कोकिसरे पंचायत समिती मतदारसंघातून केवळ भाजपचाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवार साधना सुधीर नकाशे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर जिल्ह्यात भाजपची ही पहिलीच बिनविरोध एन्ट्री ठरल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.
दरम्यान, कोकिसरे मतदारसंघातून भाजपतर्फे साधना सुधीर नकाशे यांनी दोन अर्ज भरले होते, तर अक्षता सूर्यकांत डाफळे यांनी भाजपचा डमी अर्ज सादर केला होता. मात्र या मतदारसंघातून ठाकरे सेना, मनसे किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार रिंगणात उतरवला नाही. इतर कोणत्याही पक्षाचा किंवा अपक्षाचा अर्ज न आल्याने नकाशे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या विजयानंतर वैभववाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.















Discussion about this post