जळगाव । काही दिवसांपासून चढ-उतार सुरू असले, तरी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये वाढीचा कल कायम आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या किमतीने एक नवीन उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट सोन्याचे वाढते दर पाहून ग्राहकांची धडधड वाढली.
आज सोमवारी सकाळी बाजार उघडल्यावर तब्बल १६४९ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३७ हजार ७११ रूपयांच्या नवीन उच्चांकापर्यंत जाऊन पोहोचले. सोन्याने शहरात १५ डिसेंबरला देखील एक लाख ३७ हजार ५०५ रूपयांचा उच्चांक केला होता. सोमवारी मागील उच्चांक मोडीत काढून सोने पुन्हा ऐतिहासिक उच्चांकाकडे झेपावले.
जागतिक पातळीवरील भू-राजकीय आणि व्यापारी तणाव, मध्यवर्ती बँकांकडून सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील खरेदी तसेच पुढील वर्षात व्याजदर कमी होण्याची अपेक्षा ही, सोन्याच्या तेजीमागची प्रमुख कारणे मानली जात आहेत. त्याचबरोबर सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला ओढा आणि डॉलरची कमजोरी यामुळेही सोन्याच्या किमतींना बळ मिळाले.















Discussion about this post