जळगाव । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उद्या शनिवार, ६ डिसेंबर २०२५ रोजी पाळला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संचलित ‘एक वही एक पेन संकलन ‘ उपक्रम राबविण्यात येणार असून समाज बांधवांनी या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या विचारांमधून शिकण्यासारखे मोलाचे मार्गदर्शन असून, शिक्षित आणि संघटित समाज घडवण्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. या उपक्रमातून आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे सहाय्य मिळाले आहे.
“हार नको – शिक्षणाला बळ द्या ” या घोषणेसह समितीने नागरिकांना आवाहन केले आहे की, महापरिनिर्वाण दिनी अभिवादनासाठी येतांना फुलहार, मेणबत्त्या अथवा अगरबत्त्या न आणता, त्या ऐवजी तितक्याच किमतीचे शालेय साहित्य—वही, पेन, रजिस्टर, पाटी, वाचनीय पुस्तके इ. सोबत आणावे. संकलित साहित्य पुतळ्यासमोर उभारण्यात आलेल्या समितीच्या स्टॉलवर जमा केले जाणार असून ते गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वितरित केले जाईल. बाबासाहेबांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा “हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर, रेल्वे स्टेशनजवळ, जळगाव
वेळ – सकाळी ७.०० ते रात्री ९.०० या वेळेत शैक्षणिक साहित्य स्वीकारण्यात येणार आहे.तरी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि फुलहारांवरील अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन समितीचे मोरे, बडगे, सपकाळे, सुरवाडे, यशवंते, मौर्य, इंगळे, नन्नवरे आणि सोनवणे यांनी केले आहे.















Discussion about this post