पुणे : विहिरीचं बांधकाम सुरू असताना रिंग पडून मुरुम ढासळले. यावेळी ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावच्या हद्दीत घडली आहे.बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील रहिवासी विजय अंबादास क्षिरसागर यांची म्हसोबावाडी गावच्या हद्दीत कवडे वस्ती लगत जमिन आहे. या जमिनीत विहिरीच्या बांधकामाचे काम सुरु आहे. सदरची विहिर ही 120 फूट व्यासाची आणि 127 फूट खोल आहे. या विहिरीचं बांधकामाचं काम सुरु असताना काल रात्री त्यामध्ये रिंग पडली आणि मुरुम ढासळले. यामुळे ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेले आहेत.
दरम्यान, पोकलेनच्या सहाय्याने माती काढण्याचं काम सुरू आहे घटनास्थळी पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील उपस्थित आहेत.
Discussion about this post