जळगाव । सोशल मिडीयावरील इन्स्टाग्रामवर शिविगाळ केल्याचा व्हिडिओ टाकल्याच्या रागातून सहा ते सात जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत जळगावातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. ही घटना यावल-शेळगाव बॅरेज रस्त्यावर 2 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. तुषार चंद्रकांत तायडे (18, रा.समता नगर, जळगाव) असे मृताचे नाव आहे. तुषारच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मयत तुषार तायडे याने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शिवीगाळ करणारा व्हिडिओ बनवला होता. याच व्हिडिओचा राग मनात ठेवून ही घटना घडली. संशयित विक्रम पंडित सोनवणे, राहुल शांताराम सोनवणे (दोघेही रा. जळगाव) आणि त्यांच्यासोबत असलेले इतर सहा ते सात अनोळखींविरोधात चंद्रकांत वामन तायडे (55, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
तुषार तायडे हा यावल तालुक्यातील परसाडे येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीवरून मित्राच्या दुचाकीवरून जळगावकडे परतत असताना, यावल-बोरावल मार्गावरील पाण्याच्या पाटाजवळील शेळगाव बॅरेज रस्त्यावर त्याचा रस्ता अडवण्यात आला. आरोपींनी तुषारला लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केली.
गंभीर जखमी तुषारला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिला मात्र 3 डिसेंबरच्या मध्यरात्री उपचारादरम्यान तुषारचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत तुषारचे वडील चंद्रकांत तायडे यांनी यावल पोलिसात फिर्याद दिल्यावरून राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे आणि इतर अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.















Discussion about this post