पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. दीपक टिळक यांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला.
आज लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रतिष्ठित, समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचा लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मान करण्यात येतो. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी लोकमान्य टिळक वापरायचे तसंच खास उपरणं मोदी यांना देण्यात आलं. लोकमान्य टिळक यांच्या ओळख असलेली पुणेरी पगडी यावेळी पंतप्रधानांना घालण्यात आली.
पुरस्काराचं सन्मानपत्र, ट्रॉफी देण्यात आली. या ट्रॉफीत भगवत गीता, लोकमान्यांची पगडी, केसरी वृत्तपत्राचा पहिला अंक आणि लोकमान्यांची प्रतिमा आहे.
लोकमान्य टिळक पुरस्कारात एक लाख रूपयांची रक्कम दिली जाते. ही रक्कम पंतप्रधानांच्या सुचनेप्रमाणे नमामी गंगे प्रकल्पासाठी देण्यात आली आहे.यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांची उपस्थिती होती.
Discussion about this post