मुंबई : काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेता जाहीर केला असून विदर्भातील ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, सुनील केदार यांची नावे विरोधी पक्ष नेतेपदासाठी चर्चेत असताना वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लावून काँग्रेसने डबल गेम खेळला आहे.
शिंदे-फडणवीसांचं सरकार असताना विरोधी पक्षनेतेपद पहिले राष्ट्रवादीकडे होतं. मात्र राष्ट्रवादीतील फुटीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा उद्बव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ कमी आहे. त्याचवेळी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस पक्षाकडे आले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदी कुणाला संधी द्यायची, याविषयी गेला आठवडाभर काँग्रेस नेते आणि पक्षश्रेष्ठींमध्ये मंथन सुरु होतं. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चाही केली होती. दरम्यान विविध नेत्यांच्या नावावर या बैठकीत चर्चा झाली होती. अखेर वडेट्टीवारांच्या नावाला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दर्शवला.