राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. वयानुसार कधीतरी थांबायचं का? असा माझ्या मनात प्रश्न असल्याचं शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संजय शिरसाट म्हणाले, मी दहा वर्षे नगरसेवक होतो. वीस वर्ष मी आमदार आहे. ज्याचे कधी आपण स्वप्न पाहिले नाही ते सर्व स्वप्न आपण भोगलेले आहेत. शेवटी माणसाचे वय हे त्याला काही कारणाने थांबायला भाग पाडते. आपण तिथपर्यंत विचार करायचा नाही. आपण कधीतरी थांबायचे का? असा प्रश्न माझ्या मनात आला. रोजची धावपळ आणि दगदग करण्यापेक्षा कधीतरी थांबायचे का? मी मनाशी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे की थांबले पाहिजे असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, नवी मुंबईतील सिडकोच्या 5 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर सडकून टीका केली. मलिदा गँगचे मास्टरमाईंड मंत्री संजय शिरसाटांचा राजीनामा घेऊन सरकारची उरलीसुरली विश्वासार्हता वाचवा, असे त्यांनी म्हटले. याबाबत संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. सर्व पुरावे सिडको अधिकाऱ्यांकडे द्या. तुम्ही ज्यांच्यासोबत फिरता त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत. बिवलकर यांच्या प्रश्नाला सामोरे जा. बिवलकर यांनी SIT मागणी केली. ज्यांची दलाली करता त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे, असं संजय शिरसाट म्हणाले..















Discussion about this post