एरंडोल : एरंडोल तालुक्यातील एका वस्तीगृहातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एरंडोल तालुक्यातील एका गावातील मुलींच्या वस्तीगृहातील तब्बल पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थिनींच्या संस्थेच्या अधीक्षकांसह सचिवांकडे या प्रकाराविषयी वेळोवेळी तक्रार करूनही त्यांनी चालढकल केल्याचा प्रकारही समोर आला आहे. ऑगस्ट 2022 ते जून 2023 अशा मागील दहा महिन्यांपासून हा घाणेरडा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
एरंडोल तालुक्यातील एका मुलींच्या वस्तीगृहात पाच मुली वसतीगृहात अभिरक्षेत असतांना वसतीगृहातील काळजी वाहक गणेश शिवाजी पंडीत याने पाचही बालिकांशी उपरोक्त काळात वेळोवेळी लैंगिक छळवणूक केली तसेच अनैसर्गिक अत्याचारही केला. या प्रकाराबाबत मुलींनी संस्थेचे अधीक्षक व सचिव यांना वेळोवेळी सांगितला मात्र त्यांनी ही माहिती लपवून ठेवली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शरद सदाशीवराव बागल यांच्या फिर्यादीवरून गणेश शिवाजी पंडीत, सचिव भिवाजी दीपचंद पाटील यांच्यासह महिला अधीक्षक अरुणा पंडित यांच्याविरोधात भादंवि 354, 376 (2) (ड) (एन) (क), 377, पोस्को कलम 3,4,5, 6,8,9,10,12, 19, 21, सह अनुसूचित जाती व जमाती कायदा कलम 3 (1) (अ) (ई) (व्ही) (डब्ल्यू) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.