मुंबई । साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात राजकारणाची दिशा बदलण्यासाठी आणि विविध राजकीय योजना आखण्यासाठी बड्या नेत्यांकडून दसरा मेळाव्यांचं आयोजन केलं जातं. त्याच नुसार आज राज्यात अनेक राजकीय पक्षांचे ५ दसरा मेळावे होणार आहे. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून नेमक्या काय घोषणा केल्या जाणार हे पाहणं महत्वाचे राहणार आहे.
एकेकाळी दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानात बाळासाहेब ठाकरेंची तोफ धडाडायची अन् तमाम शिवसैनिकांच्या मनगटात हिंदूत्वाची ताकद निर्माण व्हायची. पण बाळासाहेबांचं निधन झालं आणि काही वर्षानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिल्यामुळे शिवसेनेचे आता दोन दसरा मेळावे मुंबईत होतात. हे दोन दसरा मेळावे मुंबईत असणार आहे. आरएसएसचा दसरा मेळावा नागपूरमध्ये होणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवानगडावर तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा नारायणगडावर होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर या दसरा मेळाव्यांना खूपच महत्व असणार आहे.
शिवसेना ठाकरे गट दसरा मेळावा –
शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज दादर येथील शिवतीर्थ येथे होणार आहे. या मेळाव्याला सायंकाळी ५ वाजता सुरूवात होईल. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना शिंदे गट दसरा मेळावा –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतल्या गोरेगावमधील नेस्को एग्झिबिशन सेंटरमध्ये होणार आहे. हा मेळावा सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. ‘यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर, स्थळ बदललंय परंपरा नाही…’, अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने केली आहे.
पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा –
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेला भगवानगडावरील दसरा मेळावा सध्या बीडच्या सावरगाव घाट राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीत होत आहे. या मेळाव्याचे नेतृत्व भाजपा नेत्या पंकजा मुंडे करत आहेत. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरू होईल. आज पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले
मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा –
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा बीडमधील नारायणगडावर होणार आहे. नारायणगडावर मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
आरएसएसचा दसरा मेळावा –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आज होणार आहे. आरएसएसच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या दिवशी आरएसएसकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला खूपच जास्त महत्त्व असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी आरएसएसकडून शस्त्रपूजन केले जाते. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण होते. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील उपस्थित राहणार आहे.















Discussion about this post