दिवाळी आणि छठ सणानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाने विविध मार्गांवर स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता रेल्वेनं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुण्याहून नागपूरसाठी विशेष गाडी चालविण्याची घोषणा केली आहे. या गाडीला जळगाव आणि भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा आहे.
रेल्वेच्या पुणे स्थानकातून ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’साठी 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी पुणे-नागपूर-पुणे ही विशेष रेल्वे गाडी रवाना केली जाणार आहे. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी होते. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने यंदा नियोजित धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त पुणे-नागपूर-पुणे ही विशेष गाडी सुरू करण्याचे ठरवले आहे.
गाडी क्रमांक 01215 (पुणे-नागपूर) 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:50 वाजता पुणे स्थानकातून नागपूरकडे रवाना होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. गाडी क्रमांक 01216 (नागपूर-पुणे) 2 ऑक्टोबर रोजी रात्री 11:00 वाजता नागपूर स्थानकातून पुण्याकडे रवाना होऊन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4:20 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. रेल्वे विभागाने गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेची विशेष तरतूद केली आहे. तसेच प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, मध्य रेल्वेने प्रवाशांना गर्दीच्या भागातून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
स्पेशल गाडीला या ठिकाणी थांबे
दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी या मार्गांद्वारे पुणे-नागपूर-पुणे ही विशेष गाडी धावणार आहे. या गाडीला 18 डबे आहेत, त्यापैकी 16 डब्यांसाठी आरक्षण आवश्यक नाही.















Discussion about this post