बीड : बीड मधील गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नसून अशातच बीडमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली आहे. पत्रकाराच्या मुलाची भरचौकात धारदार शस्त्राने सपासप वार करत हत्या करण्यात आली. यश देवेंद्र ढाका असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून या घटनेने खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात यश ढाका या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. वर्दळ असलेल्या ठिकाणी रात्री ९ वाजताच्या सुमारास धारदार शस्त्राने पोटावर सपासप वार करत या तरुणाची हत्या करण्यात आली. हत्येमागील कारण समोर आले आहे. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत यशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी पोलिसांची टीम पंचनामा करत आहे. यश ढाका हा तरुण बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा होता. यश २२ वर्षांचा होता आणि तो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता.
यश ढाकाची हत्या त्याचाच मित्र सूरज काटेने केली. महिनाभरापूर्वी सूरज आणि यश यांच्यामध्ये वाढदिवस साजरा करताना वाद झाला होता. या वादातूनच सूरजने यशची हत्या केली. सूरजने यशवर धारदार शस्त्राने वार केले. यशच्या छातीवर करण्यात आलेले दोन वार शरीरात आरपार गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे यशने जागीच प्राण सोडले. त्याला रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दरम्यान या घटनेने बीड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.















Discussion about this post