जळगाव । एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु झाल्याने या काळात भारत सोने खरेदीला महत्व दिलं जाते. मात्र ऐन सणासुदीत जळगावच्या सराफ बाजारात सोन्यासह चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतलीय. मागच्या काही दिवसापासून सोने दरात सातत्याने दरवाढ होत असल्याचं दिसून आले. अशातच आज बुधवारी देखील सोने दराने आधीचा उच्चांक मोडीत काढून पुन्हा नवा उच्चांक केला. ज्यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांना चांगलाच हादरा बसला.
या वाढीमागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे अधिक आकर्षित होत आहेत. सोन्याला सुरक्षित मालमत्ता मानले जाते आणि जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता वाढते, तेव्हा गुंतवणूकदार अशा सुरक्षित पर्यायांकडे वळतात. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे.व्याजदर कमी झाल्यास अमेरिकन डॉलर कमकुवत होतो. जेव्हा डॉलर कमजोर होतो, तेव्हा डॉलरमध्ये खरेदी केले जाणारे सोने इतर चलनांमधील गुंतवणूकदारांसाठी स्वस्त होते, ज्यामुळे सोन्याची मागणी आणि किमती वाढतात.
जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख आठ हजार २५३ रूपयांपर्यंत होते. दुसऱ्या दिवशी आज बुधवारी ९२७ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख नऊ हजार १८० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
चांदीचे दर स्थिर
जळगावात सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह एक लाख २८ हजार रूपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, नंतरच्या दोन दिवसात चांदीच्या दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही. बुधवारी देखील चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख २८ हजार २३५ रूपये होते.















Discussion about this post