चाळीसगाव । चाळीसगाव रेल्वेस्थानकावरील सफाई कामगाराणे दूरध्वनीद्वारे रेल्वे पोलिसांना संपर्क करून आरक्षण कार्यालयात तोंड बांधून दोन दहशतवादी घुसले आहेत. त्यांच्याकडे काळी बॅग आहे, अशी माहिती दिल्यावरून तत्काळ रेल्वेचे अधिकारी आरक्षण कार्यालयाकडे रवाना झाले.
लगेचच चाळीसगाव शहर पोलिस, बीडीडीएस, क्यूआरटी, आरसीपी, आरपीएफ पथकाला पाचारण केले. सोबतच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका दाखल झाली. पोलिसांनी लगेचच परिसराची नाकाबंदी केली.
रेल्वेस्थानकात पळापळ झाली. सर्व प्रवाशांचे श्वास रोखले गेले. त्यानंतर क्यूआरटी टीमने तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्या दोघा दहशतवाद्यांना जिवंत पकडून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेऊन त्यांच्याकडे असलेली शस्त्रे जप्त केली. मात्र, रेल्वेस्थानकावरची थरारक घटना खरी नसून लोहमार्ग पोलिसांनी मॉक ड्रिल केल्याचे जेव्हा प्रवाशांना समजले, तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
Discussion about this post