आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची प्रकरणेही सातत्याने समोर येत आहेत. महाविकासआघाडीमधील अनेक नेते-पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र आता भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटातील नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शिंदे गटाला हादरा बसल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईतील मागाठाणे येथील शिवसेनेचे सुभाष येरुणकर हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्तीय आहेत. ते वॉर्ड क्रमांक ११ चे शिवसेना शाखाप्रमुख आहेत. त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे सुभाष येरुणकर हे मागील २० वर्षांपासून शिवसेना पक्षात होते. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये सुभाष येरुणकर यांचा पक्षप्रवेश झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे.
शिंदेसेनेतील सोलापूरमधील नेते शिवाजी सावंत यांनी शिंदे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा देत पक्षाची साथ सोडली. यामध्ये जिल्हा समन्वयक, उपजिल्हाप्रमुख यांसारख्या विविध तालुक्यांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला गेला होता.
Discussion about this post