जळगाव । राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलीय. पाण्याअभावी अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली असून यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. पाऊस कधी पुनरागमन करणार याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे. अशातच हवामान खात्याने राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. चला पाहूया 10 ऑगस्टला राज्यातील हवामान कसे राहील.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ हवामान असून हलक्या ते मध्यम दर्जाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील जास्तीत जास्त तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अंदाजे 26 अंश सेल्सिअस राहू शकते.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने पिवळा इशारा जारी केला आहे, तर ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पिवळा इशारा जाहीर केला आहे. तर पुणे परिसरात ढगाळ वातावरण असून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पिवळा इशारा जाहीर केला आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हे वगळता लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड यांना हा यलो अलर्ट दिला गेला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पिवळा इशारा जाहीर केला आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा सतत प्रभाव राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Discussion about this post