जळगाव । उत्तराखंड राज्यातील धराली (जिल्हा उत्तरकाशी) परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. यामध्ये जळगाव शहरातील अयोध्यानगरमधील तीन भाविक अडकले असून तीनही भाविक सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार, जिल्हा नियंत्रण कक्षाने उत्तरकाशी येथील ‘माऊंट भागीरथी होम स्टे हर्षिल’ (Mount Bhagirathi Home Stay Harshil) या निवासस्थानाशी संपर्क साधला. त्यावेळी, मेहरा कुटुंबातील अनामिका मेहरा, आरोही मेहरा आणि रुपेश मेहरा हे तिन्ही जळगावचे भाविक सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. केवळ नेटवर्क उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी थेट संपर्क होऊ शकला नव्हता.
या घटनेची माहिती मिळताच, या भाविकांचे वडील श्री. चंद्रशेखर नरवरिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत श्री. नरवरिया यांचा संबंधीत ‘होम स्टे’च्या मालकाशी संपर्क साधून दिला. यामुळे मेहरा कुटुंबासह जळगावकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जळगाव, या संदर्भात सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Discussion about this post