जळगाव । जळगाव शहरात घरफोडीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत असून अशातच शहरातील रायसोनी नगरात अंडरपँट (अर्धनग्न) गँगने दोन मंदिरांसह एक घरफोडी केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. मध्यरात्रीच्या वेळी मंदिरांचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दोन मंदिरांमधून चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटीतील रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. याशिवाय बाहेर गावी गेलेल्यांकडे घरफोडी केली. ही घटना दि. ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रायसोनी नगरात घडली.
काय आहे प्रकार ?
रायसोनी नगरमध्ये श्री गजानन महाराज मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ७०० ग्रॅम चांदीच्या पादुका, गणपतीची दीड फुटाची धातूची मूर्ती तसेच दानपेटीतील रक्कम चोरून नेली. गेल्या अनेक दिवसांपासून ही दानपेटी उघडलेली नव्हती. त्यामुळे रक्कम किती होती, हे नेमके समजू शकलेले नाही. चोरीच्या या घटना परिसरातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. तोंडाला मास्क, रुमाल लावून केवळ चड्डीवर असलेले चारजण रस्त्याने येताना दिसत आहे. एका घराकडे पाहत जात ते मंदिरांमध्ये प्रवेश करून चोरी करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मंदिरातून निघताना एकाने चप्पल हातात घेतलेली आहे, तर एकाने कमरेला बांधलेली दिसत आहे. मध्यरात्री २.३१ वाजेदरम्यानचे फुटेज कैद झाले आहेत.
श्री गजानन महाराज मंदिरापासून ४०० मीटर अंतरावर असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराकडे चोरट्यांनी आपल्या मोर्चा वळविला. या मंदिरातील दानपेटीसह तिजोरीचे कुलूप तोडून त्यातील रक्कम लांबविली गजानन महाराज मंदिरासमोर राहणारे चौधरी हे ठाणे येथे नोकरीला असून, त्यांना तेथे जायचे असल्याने ते झोपेतून लवकर उठले होते. त्यावेळी त्यांना मंदिराजवळ चारजण दिसले असता ते ‘चोर-चोर असे ओरडताच चोरटे तेथून पसार झाले. मंदिर व घरामध्ये चोरी करणारे चौघेजण हे इतर राज्यातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चोरटे या परिसरातून फिरत असताना त्यांच्या हातात चॉपर, चाकू, तलवारी यासारखे शस्त्रदेखील होते, अशी माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली. शस्त्रधारी चोरट्यांच्या संचाराने रायसोनी नगरवासीय धास्तावले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.
Discussion about this post