चाळीसगाव । सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करत गंडा घातला जात आहे. मागील काही वर्षांमध्ये हे प्रमाण वाढत चालले आहे. आमिष दाखवत तसेच काहीतरी गिफ्ट देण्याच्या बहाण्याने गंडा घातला जात आहे. अशातच चाळीसगाव येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत जवानांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका जवानाचा भ्रमणध्वनी हॅक करून परस्पर कर्ज मंजूर करून घेत सायबर भामट्याने त्यांच्या बँक खात्यातून सुमारे आठ लाख रूपयांची रक्कम हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपासाला गती देण्यात आली आहे.
चाळीसगाव येथील मूळ रहिवाशी विजय राजपूत हे सैन्य दलात शिपाई पदावर कार्यरत असून, त्यांची जम्मूत रामबण येथे नियुक्ती आहे. जून महिन्यात त्यांच्याशी एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून तब्बल सात लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज हवे आहे का म्हणून विचारणा केली. मात्र, जवान राजपूत यांनी सपशेल नकार दिला. त्यानंतर एक जुलै रोजी राजपूत यांना त्यांच्या चाळीसगाव येथील स्टेट बँकेत असलेल्या खात्यातून १३ हजार १३६ रुपये वजा झाल्याचा संदेश आला. भ्रमणध्वनीचा ताबा घेत सायबर भामट्याने परस्पर जवान राजपूत यांच्या नावे सात लाख ४३ हजार रुपये ऑनलाइन कर्ज मंजूर करून घेतले होते. आणि ती रक्कम त्याच्या दोन वेगवेगळ्या खात्यात वळती केली होती.
बँक खात्यातून रक्कम वजा झाल्याने जवान राजपूत हे सुटी घेऊन चाळीसगाव येथे तातडीने आले. त्यांनी स्टेट बँकेच्या शाखेत चौकशी केली असता त्यांच्या नावावर सात लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज उचलल्याचे दिसून आले. त्याच कर्जाच्या हप्त्याची रक्कम म्हणून १३ हजार १३६ रुपये वजा झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. आपण कोणत्याही कर्जाची मागणी केली नसल्याचे त्यांनी बँकेत सांगितले. मात्र, त्यांना बँक खात्याचा तपशील दाखविण्यात आला. त्यानंतर आपली सायबर भामट्याकडून फसवणूक झाल्याचा प्रकार विजय राजपूत यांच्या लक्षात आला.
कर्ज मंजूर झाल्यानंतर सायबर भामट्याने जवान राजपूत यांच्या बँक खात्यातून १३ ते २८ जून या कालावधीत एकूण आठ लाख पाच हजार रुपये परस्पर काढून घेतले. विशेष म्हणजे सदरची रक्कम काढल्याचा राजपूत यांच्या भ्रमणध्वनीवर कोणताही संदेश आला नव्हता. जवान राजपूत यांच्या भ्रमणध्वनीमध्ये बँकेचे अॅप आहे. आणि त्याद्वारेच ते ऑनलाइन व्यवहार देखील करतात. याच भ्रमणध्वनीचा सायबर भामट्याने अॅक्सेस मिळवून परस्पर कर्ज मंजूर करून घेत कर्जाची रक्कम काढून घेतली. दरम्यान, ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, सावधानता बाळगण्याचा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.
Discussion about this post