मुंबई । महाराष्ट्रात सध्या पावसाने उसंती घेतल्याचं दिसतेय. अनेक ठिकाणी ऊन सावळीचा खेळ सुरु आहे. दरम्यान, आज 3 ऑगस्ट रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये हलक्या ते मध्यम च्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून या प्रदेशांमध्ये पावसाचे प्रमाण घटलेले पाहायला मिळत आहे.
विदर्भात जोरदार वाऱ्यांसह आणि विजांच्या गडगडाटासह धुवांधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस विदर्भात पावसाचे वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. चला पाहूया, 3 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कसे असणार आहे.
मुंबईत मुख्यत्वे ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्येही मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगांचा गडगडाट होऊन हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.
पुण्यात बहुतांश वेळा आकाश ढगाळ राहून हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या भागांमध्येही अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही गडगडाटी ढगांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या भागांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे.
विदर्भातील नागपूर शहरात विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्येही अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अंदाज व्यक्त करण्यात आलेला नाही.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये सध्या पावसाचे प्रमाण घटलेले पाहायला मिळत आहे. मात्र, विदर्भात पावसाचे संकेत अद्यापही कायम आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तसेच, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल, अशी माहितीही हवामान खात्याने दिली आहे.
Discussion about this post