जळगाव। जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे दहावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. वैभव रवींद्र ठाकूर (वय १६) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
वैभव हा कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ संस्थेच्या विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील खाजगी चालक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
दरम्यान शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घरी कोणी नसताना वैभवने राहत्या घरी दोरीने गळफास घेतला. त्याची आई आणि भाऊ घरी परतल्यानंतर त्यांना ही हृदयद्रावक घटना दिसली. या घटनेने त्यांनी मोठा आक्रोश केला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने वैभवला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयात वैभवच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. या घटनेमुळे संपूर्ण रायपूर कुसुंबा गावात हळहळ व्यक्त होत आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.
Discussion about this post