मुंबई । गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत होते. पावसाळी अधिवेशन चालू असताना ते सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळतानाचे व्हिडीओही सगळीकडे व्हायरल झाले होते. यामुळे प्रकरणामुळे विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता या प्रकरणामुळे महायुती सरकारवर दबाव येत असल्याने कोकाटे यांचे खाते काढून घेतले जाणार असल्याची माहिती समोर आलीय.
लवकरच माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखाते काढून घेतले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्या खात्याचा कारभार अन्य नेत्याकडे सोपवला जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात बैठक झाली आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. कोकाटे यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांच्यावर अन्य खात्याची जबाबदारी सोपवली जाईल, असे सांगितले जात आहे. आज संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्षाचेच दत्ता भरणे आणि मकरंद पाटील या दोन्ही मंत्र्यांकडे असलेली खाती ही माणिकराव कोकाटे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर कोकाटे यांना दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील या दोन मंत्र्यांच्या खात्यांपैकी एक खाते दिले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Discussion about this post