जळगाव । खासदार स्मिता वाघ यांनी आज लोकसभेत जळगाव लोकसभा मतदारसंघातील हजारो रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आवाज उठवला. त्यांनी देवळाली-भुसावळ व सुरत-भुसावळ रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची त्यांनी ठाम मागणी केली, ज्यामुळे प्रवाशांच्या दैनंदिन जीवनावर होत असलेल्या परिणामांकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
खासदार वाघ यांनी विशेषतः गाडी क्रमांक १९००५ – सुरत-भुसावळ एक्सप्रेस बाबत मुद्दा मांडला. ही गाडी पूर्वी उधना स्थानकावरून रात्री ११:२७ वाजता सुटून सकाळी ८:४५ वाजता जळगावला पोहोचत असे, परंतु सध्याच्या नवीन वेळापत्रकानुसार ती सकाळी ७:०० वाजता जळगावला पोहोचते. यामुळे प्रवाशांना पहाटे ३ वाजता उठून प्रवास करावा लागतो, ज्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी वर्ग आणि महिला प्रवाशांवर मानसिक, शारीरिक व आर्थिक ताण येत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ११११३ – देवळाली-भुसावळ एक्सप्रेसच्या वेळापत्रकात झालेल्या बदलामुळेही प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गाडी पूर्वी चाळीसगावला सकाळी ७:४० वाजता आणि पाचोरा येथे सकाळी ८:३० वाजता पोहोचत होती, परंतु आता वेळेत बदल झाल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
खासदार वाघ यांच्या मते, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव आणि भुसावळ या भागांतील सुमारे ५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी, महिला, नोकरदार, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिक दररोज या बदललेल्या वेळापत्रकामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे या दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक तात्काळ पूर्ववत करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी त्यांनी रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारकडे मागणी केली. “ही मागणी केवळ वेळेच्या सोयीसाठी नसून, सामाजिक न्याय आणि प्रवाशांच्या मूलभूत हक्कांसाठी आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले.
Discussion about this post