मुंबई । परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूचा दावा केला होता. मात्र, पोलिसांच्या मारहाणीमुळे कोठडीत त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. याविरोधात महायुती सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
हा निर्णय महायुती सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे या प्रकरणाशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी राज्य सरकारही अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
परभणीत १० डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या हिंसाचारात ताब्यात घेण्यात आलेला आणि त्यानंतर पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी एक मोठा विजय मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. याप्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे सोमनाथच्या कुटुंबियांच्या आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या लढ्याला यश मिळाले आहे.
सर्वोच्च न्यायालयानेही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल उपस्थित केला. दुर्दैव हे आहे की, राज्य शासनच आरोपी आहे या केसमध्ये. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू सरकारच्या ताब्यात असताना झाला आहे. मागच्या सगळ्या केसेसमध्ये शासनाचा नेहमीचा प्रयत्न हात झटकण्याचा, तो यामध्येही केला. आम्ही कोर्टाला ही बाब लक्षात आणून दिली. जे काही नियम तयार करायचे आहे, ते आता हायकोर्ट तयार करेल. त्यामुळे भविष्यात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्यांना न्याय मिळेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
Discussion about this post